नवरात्री स्पेशल Illustration फोटोव्दारे अभिनेत्री तेजस्विनी पंडितने अन्नदात्याचे मानले आभार !!

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने नवरात्रीवेळी नऊ दिवस सामाजिक संदेश देणारे फोटोशूट करण्याचा एक पायंडाच सिनेसृष्टीत पाडला आहे. दरवर्षी वैविध्यपूर्ण कल्पनांंसमवेत तेजस्विनी पंडित नवरात्री स्पेशल फोटोशूट करत असते. यंदा आपल्या ईलसट्रेशन फोटो सीरिजमधून तेजस्विनी कोरोनायोध्द्यांना आदरांजली अर्पण करतेय. पहिल्या दिवशी डॉक्टरांना, दूस-या दिवशी पोलिसांना आणि तिस-या दिवशी सफाई कर्मचा-यांना ट्रिब्यूट दिल्यावर तेजस्विनीने चौथ्या दिवशी शेतक-यांना आदरांजली वाहिली आहे.

पाठीवर बाळाला बांधून शेतात काबाडकष्ट करणा-या शेतकरी आईचे रूप धारण करून जणू अन्नपूर्णा देवीचं शेताच्या बांधा-यावर राबत असल्याचा भास ह्या फोटोतून होतो आहे. ह्या फोटोशूटविषयी तेजस्विनी पंडित म्हणते, “वर्क फॉर्म होम करण्याची मुभा नोकरदार माणसांना असते. शेतक-याला कसलं आलंय, वर्क फॉर्म होम… अतिवृष्टी होवो, वा दुष्काळ पडो, टोळधाडीचं संकट येवो वा कोरोना… कुठलीही नैसर्गिक, प्राकृतिक आपत्ती आली तरी, अन्नदात्याला मात्र लॉकडाऊनमध्ये बसता येत नाही. त्याला उन्हा-तान्हात, पावसा-पाण्यात, थंडी-वा-यात कंबर कसून काम करावेच लागते.”

तेजस्विनी सांगते, “आपल्याकडे अन्नपूर्णादेवीची आराधना करण्याची प्रथा आहे. आपल्यासाठी शेतात 365 दिवस राबणारी ही शेतकरी महिला अन्नपूर्णाच तर आहे. आपल्या तान्हुल्याला पाठीशी बांधून तिने काम केले नाही, तर आपली कुठली पोटाची खळगी भरणार.. त्यामूळेच आपल्यापर्यंत ‘अन्न हे पूर्णब्रम्ह’ पोहोचवणा-या’ अन्नदात्याचे शतश: आभार.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *