‘गिव्ह विथ डिग्निटी’मुळे वंचितांची दिवाळी आनंदमय – मकरंद अनासपुरे

मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने तीन लाख लोकांना जीवनावश्यक साहित्य

मुकुल माधव फाउंडेशनच्या ‘गिव्ह विथ डिग्निटी’ उपक्रमातून लाखो लोकांचे जीवन प्रकाशमय

२४ राज्यात राबविला उपक्रम; आनंदीबेन पटेल, विजय रूपानी, मकरंद अनासपुरे यांचा पाठिंबा

पुणे : “मुकुल माधव फाउंडेशच्या ‘गिव्ह विथ डिग्निटी’ उपक्रमामुळे वंचितांची दिवाळी आनंदमय होईल. कोरोना आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात मुकुल माधव फाउंडेशनने गरजुंना दिलेला मदतीचा हात कौतुकास्पद आहे. या संकट काळात  कोणाचा विसर पडू नये, मदतीवाचून वंचित राहू नये, यासाठी घेतलेल्या या उदात्त पुढाकाराबद्दल ऋण व्यक्त करतो,” अशा भावना अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केल्या.
कोरोना वैश्विक महामारीमुळे देशभरात लॉकडाऊन झाला, त्यातच नैसर्गिक आपत्तीही आली आणि त्यातून मानवी संकट उभे राहिले. या कठिण परिस्थितीत देशभरातील गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी पुण्यातील मुकुल माधव फाउंडेशनने राबविलेल्या ‘गिव्ह विथ डिग्निटी’ उपक्रमांतर्गत अनासपुरे यांच्या हस्ते गरजू रंगमंच कलाकारांना किराणा व जीवनाश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. आरोग्य, शिक्षण, सामाजिक कल्याण, जल संधारण  आणि पर्यावरण  अशा सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे.

‘गिव्ह विथ डिग्निटी’ उपक्रम भारतातील २४ राज्यांतील ७० हजार कुटुंबातील तीन लाख लोकांपर्यंत पोहोचला. चार सदस्यीय कुटुंबाला २१ दिवसांसाठी पुरेल इतके साहित्य देण्यात आले. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी,  उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी या उपक्रमाचा शुभारंभ केला. भारताला पुन्हा एकदा आपल्या पायावर उभे करण्याच्या उद्देशाने ‘गिव्ह विथ डिग्निटी’ उपक्रम राबवला. या उपक्रमाला समविचारी मित्र, दात्यांचा सहभाग लाभला. फिनोलेक्स इंडस्ट्रीज, केव्हिनकेअर, मारिको, हिंदुजा फाऊंडेशन, नेसले, इंडोरमा, इंडसइंड बँक आदींचा समावेश आहे.


महामारीच्या काळात अनिश्चितता हा कळीचा मुद्दा झाला होता. प्रत्येक क्षणी नव्या आव्हानाला सामोरे जाण्याची, हाताळण्याची वेळ आली. अशावेळी नाऊमेद न होता मुकुल माधव फाऊंडेशन गरजूंपर्यंत पोहोचले. स्थानिकांना जगण्यासाठी आणि आर्थिक मदत करण्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनने किराणा पाकिटे तयार करण्यासाठी स्थानिक मध्यम उद्योग आणि देशभरातील लहान उदयोजकांकाडून उत्पादने घेतली. देशातील लघु आणि मध्यम पातळीच्या उद्योगांना सहाय्य करण्याच्या फाऊंडेशनच्या या प्रयत्नांचे आणि कल्पनेचे कौतुक केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी देखील केले आहे.

मुकुल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितु प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, “वैश्विक महामारीचा हा काळ आव्हानात्मक होता. लोकांच्या आर्थिक, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर, तसेच दैनंदिन आयुष्यातील अनेक गोष्टींवर त्याचा नकारात्मक परिणाम झालेला दिसून आला. ‘गिव्ह विथ डिग्निटी’ उपक्रमातून अनेक कुटंबांच्या आयुष्यात आशेचा दिवा तेवत राहुन ही दिवाळी प्रकाशाने उजळून निघावी, अशी आशा आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *