स्त्रीयांना ‘स्व’ची जाणीव होणे गरजेचे – डॉ. अपूर्वा अहिरराव

पुणे : व्यवस्थित रहाणं, सुदृढ असणं, सुंदर दिसणं आणि छान विचारातून भाषा शुद्ध असणं या गोष्टी आपल्या स्वतःचा “आत्मविश्वास” वाढवत असतात. आपल्याला आवडणारी काम करता येणं आणि आयुष्यात एखाद्या ध्येयाने प्रेरित होणं हे नक्कीच आपली “स्व” ची जाणीव वाढवतात. “स्वत्व” – म्हणजे काय तर स्व ची म्हणजेच स्वतःची जाणीव करुन देणारं तत्व. आपले स्वतःचे अस्तित्व विसरुन आयुष्यभर दुसऱ्यांसाठी राबणाऱ्या स्त्री ला कधीकधी हे समजतच नाही की तिलाही भावना आहेत, इच्छा आहेत आणि स्वत:चे विचार आहेत. अगदी खूप मोठी महत्वाकांक्षा नसेल पण किमान ध्येय तरी असल्याची जाणीव होणं गरजेचं आहे असे मत संकल्प ह्यूमन रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संचालिका डॉ. अपूर्वा अहिरराव यांनी मांडले.

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि ऑनलाईन स्वराज्य आयोजित “संवाद आत्मनिर्भर नवदुर्गांशी” या फेसबुक लाईव्ह सीरिजमध्ये डॉ. अपूर्वा अहिरराव यांच्याशी संवादक प्रणोती शितोळे यांनी संवाद साधला.

डॉ. अपूर्वा म्हणाल्या, विविध क्षेत्रातील 60 टक्के महिला आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि कुटुंब चालविण्यासाठी घराबाहेर पडते. घर आणि काम अशी तारेवरची कसरत करत असताना कुठेतरी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेच असतं. वेळच्या वेळी आरोग्य तपासण्या करून घेणे आणि आरोग्याचा ‘ स्टेटस’ काय आहे हे जाणून घेऊन याबाबत अपडेट रहावे.” असा सल्ला यावेळी डॉ. अपूर्वा यांनी दिला.

स्त्रियांनी स्वतःची ओळख स्वतः करून घ्यावी. स्वतःमधील ‘स्कील’  ओळखणे गरजेचे आहे, आपल्या आवडीचे काम निवडा स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करा आणि हे पूर्ण झाल्यावर जो आनंद मिळतो तो अनुभवा. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे या सगळ्या गोष्टी करत असताना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या.  कोणताही त्रास होत नाही ना? त्रास होत असेल तर अंगावर न काढता वेळीच उपचार करणे महत्वाचे असतं कारण त्यामुळे विविध प्रकारच्या त्रासांचे व्याधी मध्ये रूपांतर होऊ शकते. आरोग्य विषयी महिलांनी आरोग्यनिर्भर व्हायला हवं असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.

‘संकल्प’च्या कामाविषयी अधिक माहिती देताना डॉ. अपूर्वा म्हणाल्या, मेडिकल न्यूट्रिशन थेरेपी तसेच ‘आहार हेच औषध’ हि संकल्पना घेऊन संकल्प आता जागतिक पातळीवर नावारूपाला येत आहे. आहार, विहार आणि विचार या त्रीसुत्रीच्या आधारे कोणत्याही आजारावर यशस्वीपणे  मात करू शकतो. महिलांच्या आरोग्याच्या आजच्या गरजा काय आहेत हे समजून घेऊन महिलांचे आरोग्य यावर देखील संकल्पचा रिसर्च सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *