सामाजिक कार्यकर्ते सुरेश (अप्पा) माळवदकर यांचे निधन

पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते सुरेश दत्तात्रय उर्फ अप्पा माळवदकर यांचे नुकतेच निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पुण्याच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात माळवदकर यांचे योगदान उल्लेखनीय राहिले. त्यांचा ‘सरळ-सरळ’ हा काव्यसंग्रह केंद्रीय मंत्री दिवंगत प्रमोद महाजन यांच्या हस्ते प्रकाशित झाला होता. 
कसबा पेठ, सेनादत्त पेठ येथे अप्पा माळवदकर यांचे बालपण गेले. वडील शिक्षण असल्याने लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड होती. समाजभान ,प्रामाणिकपणा, मेहनत, निष्ठा, वेळेचे महत्व ही तत्वे त्यांनी आयुष्यभर जपली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष, पुणे महानगर पालिकेच्या परिवहन समितीचे सदस्य म्हणून त्यांनी भरीव काम केले. राजकीय कारकीर्दीत माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचे लाडके कार्यकर्ते, तर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर ,खासदार गिरीश बापट ,दिलीप कांबळे, प्रदीपदादा रावत आदी त्यांचे चांगले सहकारी बनले. २०००-०५ या कालावधीत पीएमटी समितीचे सदस्य असताना त्यांनी दैनिक प्रवासी पास, प्रवासी मार्गाची बस संख्या आणि वेळा, ड्राइवर व कंडक्टरच्या अडचणी, प्रशासनाचा कारभार आदी मुद्द्यांवर भर दिला. शेकडो गरजू तरुणानांना त्यांनी पीएमटीमध्ये नोकरीस लावले. अपंगासाठी स्वखर्चाने साहित्य वाटप केले.
माळवदकर यांनी चालवलेल्या रक्तपेढीतून अंदाजे ३७,००० जणांची माहिती गोळा करून आपत्कालीन वेळी रक्त उपलब्ध करून देण्याचे कार्य गेली अखंड १९ वर्षे सुरु ठेवले होते. शिवाय, या लोकांना वाढदिवशी पत्राद्वारे शुभेच्छा देण्याचा उपक्रम अनेक वर्षे जपला होता. शहराच्या चहूबाजूला त्यांनी आपले कार्य विस्तारत ठेवले होते. जनता पक्षाचे युवा अध्यक्ष, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारणीचे सदस्य, पर्वती मतदार संघाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पहिले. भाजपच्या पडत्या काळात महाराष्ट्रभर दौरे केले. सेनादत्त पेठेत स्थापलेल्या सांस्कृतिक प्रतिष्ठान मार्फत अनेक सांस्कृतिक, क्रीडाविषयक उपक्रम घेतले. सेनादत्त पेठ नवचैतन्य क्रीडा संघाचे ते स्वतः संस्थापक व कार्याध्यक्ष होते. नवरात्री, कोजागरी पौर्णिमा, दिवाळी, शिवजयंती साजरी होत असे. अनेक तरुणांना त्यांनी उद्योजक बनवले. वरून कणखर वाटणारे अप्पा माळवदकर आतून खूप प्रेमळ, हळवे होते. ते एक हाडाचे आणि जिंदादिल कार्यकर्ता होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *