कुसुमवत्सल्य फांउडेशनतर्फे महाराष्ट्राची सौभाग्यवती स्पर्धेचे आयोजन

पुणे, दि. 24 नोव्हेंबर: महाराष्ट्रातील प्रत्येक गृहिणीला तिची आवड जोपासण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळावं, तसेच लॉकडाउन काळात पडद्यामागील अनेक तंत्रज्ञ आणि कलाकार यांच्या जगण्याला नवीन उमेद देण्यासाठी “महाराष्ट्राची सौभाग्यवती” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कुसमवत्सल्य फांउडेशनतर्फे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तर ‘संकल्प’ मानवसंसाधन विकास संस्था कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यातील असंख्य महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून या स्पर्धेची अंतिम फेरी बुधवार, दि. 25 नोव्हेंबर रोजी महाबळेश्वर येथे होणार आहे.
कुसमवत्सल्य फांउडेशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भवाळकर म्हणाले कि, महाराष्ट्रातील सर्व स्तरातील विवाहित स्त्रियांचा विचार करून सदर स्पर्धेची आखणी केलेली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने ही स्पर्धा फक्त स्पर्धकांपुरती मर्यादित न राहता या स्पर्धेचा उपयोग पडद्यामागील इतर तंत्रज्ञ आणि कलाकार मंडळीनाही व्हावा. गेले काही महिने महाराष्ट्रासाठी खुपच अवघड गेले, त्यात प्रामुख्याने हातावर पोट असणाऱ्यांची बिकट अवस्था झाली. फिल्म इंडस्ट्रीमध्ये हे लोक छोटी-मोठी कामे करत होती, त्यांचे खायचे हाल झाले तसेच ब्युटिशन, पार्लरवाल्यांचे अक्षरश: दिवाळे निघाले. काहींचे मानसिक संतुलन दिवसेंदिवस ढासळत गेले तर काहींनी आत्महत्या केली. या सर्वांची अवस्था लक्षात घेता कुसुमवत्सल्य फाउंडेशनने या स्पर्धेला त्यांच्या अर्थार्जनाचे साधन मानले व आपला समाजसेवेचा प्रेम शाबूत ठेवला. या एका स्पर्धेच्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार प्राप्त होईलच पण त्याचबरोबर आपापल्या व्यवसायात गमावून बसलेली उमेद त्यांना पुन्हा नव्याने जगता येईल. महाराष्ट्रातील तमाम गृहिणींना आपली कला जोपासता येईल व त्यांच्यात नवीन चैतन्य निर्माण होईल.
संकल्प मानवसंसाधन विकास संस्थेचे संचालक डॉ. पी.एन.कदम म्हणाले कि, लॉकडाउन दरम्यान प्रत्येक घरातील स्त्रीला मोठ्या प्रमाणात जबाबदारी पार पाडावी लागली. या सर्व जबाबदारीतून थोडा विरंगुळा मिळण्याबरोबर स्वत:चे स्वास्थ आणि सौंदर्य जोपासण्याची गोडी लागली पाहिजे. या उद्देशाने संकल्पतर्फे नैसर्गिक संसाधनांचा वापर करुन स्त्रियांच्या स्वास्थ आणि सौंदर्य अबाधीत ठेवण्यासाठी रिसर्च सुरु आहे. लवकरच याबाबतील सौंदर्य प्रसाधने उपलब्ध होणार असल्याची माहिती डॉ. कदम यांनी दिली.