‘आयसीएआय’ पुणेच्या अध्यक्षपदी अभिषेक धामणे

उपाध्यक्षपदी समीर लड्ढा, सचिव-खजिनदारपदी काशिनाथ पाठारे यांची निवड

पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखेच्या २०२०-२०२१ या वर्षासाठी कार्यकारिणी जाहीर झाली आहे. अध्यक्षपदी सीए अभिषेक धामणे, उपाध्यक्षपदी सीए समीर लढ्ढा, सचिव व खजिनदारपदी काशिनाथ पाठारे यांची निवड झाली आहे. सीए अमृता कुलकर्णी, सीए राजेश अगरवाल, सीए अभिषेक झावरे यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली आहे. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष सीए अभिषेक धामणे यांनी मावळत्या अध्यक्षा सीए ऋता चितळे यांच्या हस्ते पदभार स्वीकारला. यावेळी केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, विभागीय समितीचे सदस्य सीए आनंद जाखोटिया, सीए अरुण आनंदागिरी, सीए यशवंत कासार उपस्थित होते.    
सीए ऋता चितळे यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या कामांविषयी तसेच राबविलेल्या योजनांविषयी माहिती दिली. यामध्ये सीएच्या विद्यार्थींकरीता चालवण्यात येणारा फाउंडेशन कोर्स, सीए सभासद व विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली नाइट मॅरेथॉन, आयकर, जीएसटीसह इतर सरकारी योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

सीए अभिषेक धामणे म्हणाले, “देशाच्या आर्थिक विकासात सीएचे महत्व समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी २०२०-२१च्या कार्यकाळात काम केले जाईल. सभासदांना वेळोवेळी नवीन माहिती आणि तंत्रज्ञान याबद्दल अद्ययावत ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. इमेज (प्रतिमा), इंटलेक्ट (उद्दिष्टपूर्ती) आणि इन्फ्रास्ट्रक्चर (पायाभूत सुविधा) ही तीन मुख्य उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवली आहेत. भागीदार, व्यावसायिक, प्रोफेशनल्स आणि सामान्य नागरिकांमध्ये ‘सीए’विषयी आदरभाव रुजविण्यासह आपले योगदान दाखवणे. तंत्रज्ञानाची सांगड विविध उपक्रम राबविण्याचा आणि त्यातून नवनवीन गोष्टींचे उद्दिष्टपूर्ती करण्याचा मानस आहे. पुणे ब्रांचमध्ये अधिकाधिक चांगल्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आणि विद्यार्थी, सभासदांना विविध प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल.” आयसीएआय पुणे शाखेची सुरुवात १९६२ मध्ये झाली. आज पुणे शाखेचे ७५०० पेक्षा अधिक सभासद आहेत. तर २२००० पेक्षा जास्त विद्यार्थी पुणे शाखेशी संलग्नित आहेत. बिबवेवाडी येथील आयसीएआय भवन येथे अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असलेल्या संस्थेत सनदी लेखापालांसाठी अनेक उपक्रमांचे आयोजन वर्षभर केले जाते. त्यामध्ये कार्यशाळा, चर्चासत्रे आदी गोष्टींचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *