महेश कोठारेंना विधानपरिषदेवर संधी देण्याची ‘सलाम पुणे’ची राज्यपालांकडे मागणी

पुणे : प्रख्यात अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांना विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून संधी द्यावी, अशी मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पुण्यातील सलाम पुणे या संस्थेने केली आहे. या संस्थेचे अध्यक्ष शरद लोणकर आणि कार्याध्यक्ष सुभाषचंद्र जाधव यांनी या संदर्भात राज्यपालांना आज पत्र पाठविले आहे. १९६८ पासून बालकलाकार असताना ‘तू कितनी अच्छी है, प्यारी प्यारी है, ओ मा…’ या राजा और रंक सिनेमातील लोकप्रिय गाण्यापासून ते आजवर महेश कोठारे यांनी केलेल्या सिनेक्षेत्रातील प्रवासाचा अनेकदा गौरव झाला आहे. दोनवेळा फिल्मफेअर, आठवेळा महाराष्ट्र शासनाचे, तीनवेळा सलाम पुणे पुरस्कार मिळविणाऱ्या महेश कोठारे यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधून कलावंत घडविले. त्यातील अनेकाना उभ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतले. कोठारे यांचा संपूर्ण परिवार सिने सृष्टीत कार्यरत आहे. आपल्या योगदानाने कोठारे परिवाराची ओळख घराघरात निर्माण झाली आहे. जनतेशी त्यांची थेट नाळ जोडली गेली आहे. एका खऱ्या कलाहित, समाजहित जोपासणाऱ्या प्रख्यात अभिनेत्याला अर्थात महेश कोठारे यांना विधानपरिषदेवर काम करण्याची संधी द्यावी अशी विनंती आहे, असे या पत्रात लोणकर आणि जाधव यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *